वर्धा - जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. कारंजा, आर्वी आणि देवळी तालुक्याच्या काही भागात जोरदार पावसासोबतच गारपीटही झाले. आर्वी आणि कारंजा तालुक्यात १० ते १५ गावामध्ये बोराच्या आकाराची गार पडली. यामुळे शेतीपीक आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहेत.
कारंजा तालुक्यात धानोली, रहाटी, काजळी, आगरगाव, कन्नमवार, बांगडपूर, सावल, गवंडी, आर्वी तालुक्यात शिरपूर, पाचोड, चिंचोली, पांजरा, हिवरा आदी भागात जवळपास १० मिनिटे गारा कोसळल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्याच्या इतर भागात अर्ध्या तासापर्यंत जोरदार पाऊस झाला. पाऊस, गारपिटीमुळे कापूस, गहू, हरभरा, संत्रा, तूर आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. कापूस ओला झाला आहे. गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात संत्राही गळून पडला आहे. तूर जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.