वर्धा - समुद्रपूरचे ठाणेदार आणि स्थानिक गुन्हे शाखेने शिवणी शिवारात धाड टाकून नदीलगतच्या झुडपातील लपवून ठेवलेला ४ लाख रुपयांचा दारुचा सडवा नष्ट केला आहे. ग्रामीण भागात गावठी दीरू ही जास्त प्रमाणात विकली जाते. ही दारू बनविण्यासाठी कच्चा माल म्हणून मोहाचे फूल आणि गुळाचा वापर करून सडवा तयार केला जातो.
ग्रामीण भागात विकली जाणारी ही दारू किती घाणेरड्या पद्धतीने तयार होते ते या कारवाई दरम्यान तयार केलेल्या व्हिडीओमधून स्पष्ट होते. दारू बनवण्यासाठी कच्च्या मालाचे मिश्रण ८ ते १५ दिवस ड्रममध्ये भरून सडवले जाते. त्यांनतर यापासून दारू काढली जाते.
समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण मुंडे आणि डीबी पथकाचे अरविंद येनूरकर, रवी पुरोहित, वैभव चरडे, आशिष गेडाम आणि सागर वाटमोडे यांनी वॉश आऊट मोहिमेंतर्गत तब्बल ५३ ड्रम लपवून ठेवलेला दारू सडवा नष्ट केला. यावेळी पोलिसांना लक्षात येऊ नये म्हणून ड्रम जमिनीत पुरून ठेवले होते. यामध्ये जवळपास ४ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.