वर्धा - येथील बसस्थानकावर एका तोतया पोलीस शिपायाला चौकशीत घेण्यात आले. मात्र, यावेळी त्याने चक्क पोलीस कर्मचाऱ्यांशी मी पोलीस असल्याचे सांगूनच फसवणूक केल्याने चांगलीच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हा तोतया हुबेहुब पोलिसांचा गणवेश घालून पोलीस कर्मचारी म्हणून वावरत असल्याने त्याने आणखी काहींची फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित तालेवार असे तोतया या पोलिसाचे नाव आहे. तर, भूषण दांडेकर असे दुचाकीच्या नावावर 70 हजाराची फसवणूक झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्या वाढलेल्या दाढीने तो तोतया असल्याचे पुढे येताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
वर्ध्यातील मुख्य बस स्थानकावर पोलीस गणवेश घालून आढळून आल्याने त्याला शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सुरुवातीला कुठला आहे असे विचारले असता पुलगाव पोलीस ठाण्याला असल्याचे त्याने सांगितले. मात्र, वाढलेली दाढी पाहताच ठाणेदार योगेश पारधी यांनी त्याला पोलिसी भाषेत विचारले असता तो तोतया असल्याचे उघडकीस आले. शिवाय कुठे राहत असल्याचे विचारले असता तो कुरझडी जामठा येथील असल्याची माहिती मिळाली. या तोतयाकडून पोलिसाची वर्दी, डोक्यावरची कॅप, पोलीस बेल्ट, बक्कल न. 41 असा उल्लेख असलेली पोलीस नेमप्लेट, एवढेच नव्हे तर पोलीस परेडचे डीएमएस बूटसुद्धा आढळून आले आहेत. आपण पोलीस असे सांगून वावरत असताना एका मुलीची फसवणूक केली असल्याचे सुद्धा समजत आहे. त्याच्याकडून हे सर्व साहित्य जप्त करत तोतया पोलीस असल्याचे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - वर्ध्यातील वैद्यकीय जनजागृती मंचाच्या कार्याचे 'जल'शक्ती मंत्रालयाकडून कौतुक
दाढीवरून पटली तोतया असल्याची ओळख
पोलीस कर्मचाऱ्यांना दाढी वाढवतानासुद्धा वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. यामुळे वाढलेली दाढी कशी काय अशी विचारणा केल्यावर तो योग्य उत्तर देऊ शकला नाही. त्यानंतर त्याला विचारणा केली असता, सुरुवातीला पुलगाव पोलिसांत असल्याचे तो म्हणाला. मात्र, नंतर बाहेर जिल्ह्यात असल्याचे त्याने सांगितले. दोन्ही ठिकाणी माहिती घेतली असता त्याची नोंद मिळाली नाही. अखेर गावाची ओळख मिळवल्याने त्याची माहिती काढण्यात आली.
पोलीस कर्मचाऱ्यालाच फसवले
भूषण दांडेकर हा पोलीस मुख्यालयाला कार्यरत आहे. त्याला अमित तालेवार याने पोलीस असल्याचे सांगितले. अमितने बुलेट घ्यायची आहे असे सांगून त्याच्याकडून पल्सर देतो म्हणून 70 हजार रुपये घेतले. तसेच सदर बाईक काकांची असल्याने वाहन घेण्याचा प्रयत्न केला असता ते वाहन फायनान्सवर असल्याचे समोर आले. वारंवार पैसे मागूनही ते मिळाले नाही, पण अमित तोतया असल्याचेही भूषण ओळखू शकला नाही हे ही विशेष.
त्याला पोलीसवर्दी साहित्य मिळाले कुठून?
या प्रकरणी अमितकडून पोलीस वर्दी, टोपी, बेल्ट, बूट, नेम प्लेट, आदी साहित्य कुठून मिळाले याचा तपास करणे बाकी आहे. यासह त्याने आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे, याचाही शोध घेणे गरजेचे आहे. तो ज्या लॉजवर पोलीस बनून राहत होता तिथून पोलीस व्हीसल आणि वर्दी जप्त करण्यात आली आहे. याचा पुढील तपास ठाणेदार योगेश पारधी करत आहे. या प्रकरणात जमादार दत्तात्रय ठोंबरे, पोलीस कर्मचारी सचिन दवाळे, ज्ञानेशवर निमजे, इम्रान खिलची, महादेव सानप, सचीन धुर्वे, सचिन इंगोले, सचिन मोगली हे अमितने आणखी काही गुन्हे केले का याचा शोध घेण्याचे काम करत आहेत.
हेही वाचा - तोतया पोलीस भासवून धमकावत केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार