वर्धा - कोरोनाचे संक्रमण शहरांपासून ग्रामीण भागातही जाऊन पोहचले आहे. कोरोनामुळे गावे भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी या गावात बाहेरच्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या गावात 70 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे बाहेर गावातून येणाऱ्यांना आठ दिवसासाठी बंदी घालण्यात आली आहे.
वर्धमनेरी गावातील गावकऱ्यांनी 1 मे 8 मे 2021 या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये बाहेरील गावातील नागरिकांसाठी गावात प्रवेश बंदी केली आहे. गावात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये. गावातील बधित रुग्णांमुळे कोणाला बाधा होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे उपसरपंच गजानन ढोले यांनी सांगितले. गावात देखील सकाळी 11 नंतर सर्व किराणा आणि इतर दुकाने बंद करून घराबाहेर विनाकारण फिरण्यावर बंदी घातली आहे. आर्वी तालुक्यातील मध्यम स्वरूपाची लोकसंख्या असलेल्या या गावात 70 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची बाधा झाली असून अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 18 आहे.
शेतीच्या कामावर होणारा परिणाम टाळण्यासाठी उपाय -
ग्रामीण भागात आता शेती मशागतीचा हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व परिस्थिती कोरोनाचा संसर्ग झाल्यास या कामांवर मोठा परिणाम होऊ शकतो. यामुळे शेतीच्या कामासाठी अडचणी निर्माण होऊ नये यासाठी अगोदरच गावबंदीचा उपाय करण्यात आला आहे.