वर्धा - पिकांचे राखण करण्यासाठी शेतातील गोठ्यात मुक्कामी राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याची घटना घडली. शेतात दुर्गंधी पसरल्याने शेजारच्या शेतकऱ्याने जाऊन पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सेलू तालुक्यातील घोराड गावात यामुळे खळबळ उडाली. महादेव खिरडकर (वय ६५) आणि लक्ष्मी खिरडकर (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत.
घोराड येथे महादेव खिरडकर यांच्या मालकीची सात एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. शेतात सध्या हरभऱ्याचे पीक आहे. खिरडकर पती-पत्नी हरभरा पिकाचे राखण करण्यासाठी कधी-कधी शेतात मुक्कामी रहायचे. शेतात वास्तव्यास असताना अज्ञाताने हल्ला करून त्यांची हत्या केली. दगड आणि कपाशी उपटण्याच्या चिमट्याने ही हत्या करण्यात आली.
हेही वाचा - बीड : चंदन सावरगाव जवळ भीषण अपघात; तीन ठार, 15 जखमी
मृतदेहाला दुर्गंधी सुटल्याने ही घटना रविवारी सायंकाळी घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. खिरडकर यांचे शेत रस्त्यापासून दूर असल्याने ही घटना उशिरा उघडकीस आली. मात्र, या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी श्वानपथकाला बोलावण्यात आले होते. सेलू पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.