वर्धा - कोरोनामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड बसल्याने मजूरांची पायपीट थांबायचे नाव घेत नाही आहे. संचारबंदी असताना मोठ्या संख्यने मजुरवर्ग पायपीट करत घराच्या दिशेने निघालेला आहे. आष्टीतून निघालेले हे मजूर मध्यप्रदेशच्या मंडला येथे जाण्यासाठी वाहन नसल्याने पायी निघाले आहेत. हे अंतर 150 किलोमीटर असले तरी, घराची ओढ लागल्याने पायी चालायला ताकद मिळत असल्याचे ते म्हणाले.
मध्य प्रदेशच्या मंडला येथील 14 ते 15 मजूर वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात रोजगार मिळवण्यासाठी आले. मात्र, कोरोनामुळे हाताला काम आणि खिशात पैसा नसल्याने पायपीट बरी म्हणत त्यांनी आता घरी पायी चालायला सुरुवात केली आहे. वाटेत मिळले तिथे चहापाणी-नाश्ता करायचा आणि पुढे चालायचे, अशी स्थिती आहे.
दिवसभरात 30 ते 40 किमी गाठायचे, अधूनमधून विसावा घेऊन पुढे चालायचे. साधारणत: तीन ते चार दिवसात ते मंडला जिल्ह्यात पोहचतील. आष्टीवरून जवळपास 50 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग सहा लागतो. तेथून जात असताना कारंजातील काही नागरिकांनी सामाजिक बांधीलकी जपत त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था केली.
पुढील प्रवासात काय मिळेल, याची काही खात्री नसताना घराची लागलेली ओढ यावर हा प्रवास केला जात आहे. कोरोनाच्या भीतीपुढे पोटाची भूक अधिक प्रभावी ठरत आहे. काम धंदा नसल्याने उपासमार होऊ नये, यासाठीच चार दिवसांची उपासमार सहन करत पुढे गावाकडे जात असल्याचे यातील काहीजण म्हणाले.