वर्धा- जिल्ह्याच्या मांडला शिवारातील बिबट शिकार प्रकरणातील तपास कामात वन विभागाला चांगले यश मिळाले आहे. यात सुरुवातीला मुख्य आरोपीसह ८ जणांना अटक करण्यात आली होती. यात आता नव्याने तिघांना अटक केल्याने आरोपींची संख्या ११ वर जाऊन पोहोचली आहे. शिवाय, शिकारीचा उद्देशही मिळाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. यात वन विभागाने जरी अधिकृत खुलासा केला नसला तरी प्रकरणाचा संबंध जादूटोण्याशी असल्याची सूत्रांची माहिती आहे.
यात सुरुवातीला बिबट्याचा शेतातील फासात अडकल्याने मृत्यू झाला, असाच फार्स निर्माण करण्यात आला. या प्रकरणात सदर घटना गोविंद केकापूर यांच्या शेतातील असल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर वनविभागाने बिबट्याचे अवयव कापून टाकण्याचे कारण शोधण्यास सुरुवात केली. याप्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आरोपींकडून शिकारीचा उद्देश जाणून घेण्यासाठी आणि हत्यार जप्त करण्यासाठी वनविभागाने न्यायालयाला वन कोठडी मागितली. याबाबत न्यायालयात आपली बाजू मांडण्यास वन विभागाला यश आले.
चौकशी सुरू झाल्यावर आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि हत्येचा संशयाची सुई जादूटोण्याकडे जात असल्याने यात आणखी ३ नावे पुढे आली. तिघांना अटक केल्याने गुन्ह्यामागील उद्देश जवळजवळ स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे. यात तिघाही आरोपींसह एक गायब असलेला पंजा आणि दोन बिबट्याची नखेसुद्धा मिळाली असल्याचे सांगितले जात आहे. बिबट्याचे चारही पंजे, मुंडके, शेपूट आणि अंडाशय, जनेंद्रिय हे जप्त करण्यात आले आहे. बिबट्याच्या अवयवांचा जादूटोण्यात उपयोग होत असल्याचे अज्ञान काही आरोपींमध्ये आल्यातूनच ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. यात वन विभागाने अधिकृत स्पष्ट केले नसले तरी चर्चा मात्र जादूटोण्याशी जोडला जात आहे.
अटक झालेल्या आरोपींची संख्या अकारावर
बिबट शिकार प्रकरणी गोविंद केकापुरे, प्रवीण बुरघटे, मंगल मानकर, महेश आमझरे, राहुल कासार, रमेश कासार, नरेंद्र कासार, अशोक चाफले यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. यात शनिवारी आनंद चाफले, आनंदा रावेकर, राजू कुंभेकर या तिघांना अटक करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बिबट्याच्या शिकारप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या ११ वर जाऊन पोहोचली आहे. हे सगळे वर्ध्याच्या वाघदरा या गावातील रहिवाशी आहे.
सहाय्यक उपवनसंरक्षक तुषार डमढेरे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या तपासात वन विभागाला मोठे यश मिळाले आहे. यात वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड, क्षेत्र सहाय्यक उमेश शिरपूरकर, श्याम परटके, रवी राऊत यांच्यासह वन कर्मचारी मनीष कुडके, रामचंद्र तांबेकर, विनोद सोनवणे, माधव माने, धनराज मजरे, जाकीर शेख, प्रेमजीत वाघमारे, दिनेश उईके, दिनेश मसराम, वसंत खेळकर, नीलेश राऊत, चंदू कुटारे, गिरीश गायकवाड यांचा सहभाग आहे. याप्रकरणी पुढील तपास मोहिमेत आणखी कोणती माहिती हाती लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा- वर्ध्यातून निवडणूक लढवण्याची सुप्रिया सुळेंची इच्छा