वर्धा - कोरोना विरोधात लढा देण्यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. यात जिल्हा प्रशासनाच्या सोबतीला सामाजिक संस्थाही हातभार लावत आहेत. यातच वर्ध्याच्या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन एक आगळी वेगळी संकल्पना राबवली आहे. केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावरील हा भाजी बाजार सध्या कोरोनाचा लढ्यात मदत करणारा ठरत आहे. यामुळे याची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेसबुकच्या 'पीएमओ इंडिया रिपोर्ट कार्ड'च्या पेजवर कौतुक झाले आहे.
वर्धा शहरातील भाजी बाजार छोट्याशा जागेत असल्याने लोकांची प्रचंड होणारी गर्दी हे मोठे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या पुढे होते. यावेळी भाजी बाजार शहरातील विविध भागात हलवण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्यावर देण्यात आली. तहसीलदार प्रीती डुडुलकर यांच्यासह नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांच्या प्रयत्नाने स्थलांतर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. यामधून लोकांमधले समाजिक अंतर ठेवण्याच्या आवाहनाला काही प्रमाणात यश आले. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महेश मोकलकर हे सामाजिक संस्थेशी जुळून असल्याने मित्र आसिफ जाहिद यांच्या चर्चेतून ही आगळ्या वेगळ्या बाजाराची कल्पना पुढे आली.
भाजी बाजारातील गर्दी आणि कोरोनाचा लढ्यातील सोशल डिस्टनसिंगच्या शस्त्राचा अवलंब करायचा होता. यासाठी युद्धभूमी म्हणून वूमेन्स एज्युकेशन सोसायटीचे कन्या शाळेचे मैदान मोफत मिळल्याने जागेचा प्रश्न सुटला. अभियंता असलेले महेश मोकलकर यांच्यासह एसडीओ सुरेश बगळे यांच्या प्रयत्नातून डिजाईन पुढे आले. यावर काम सुरू झाले. कमी खर्चात हे डिजाईन तयार झाले. पैशासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून व्यवसायिक नितीन शिंदे यांच्यासह रोटरीच्या सदस्यांनी खर्चाचा भार उचलला.
कसा आहे हा भाजीबाजार -
इथे येणाऱ्या नागरिकांना गेटपासून हात स्वच्छ धुण्याची ठिकठिकाणी सोय, प्रत्येक दुकानासमोर सॅनिटायझरची बॉटल, तापमान पाहता हिरवी चटई, दोन दुकानातील ठराविक अंतर, दुकासमोर गर्दी टाळण्यासाठी सोशल डिस्टनसिंग ठेऊन बसायला खुर्च्या, भाजी विक्रेत्याना मास्क आणि हॅन्डग्लव्हज, नागरिकांनी प्लास्टिकचा उपयोग टाळावा म्हणून कापडी पिशव्या इत्यादी सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. भाजी बाजारातून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका टळला म्हणायला सध्यातरी हा भाजी बाजार आदर्श ठरत आहे. कारण लोकांची सवय तोडायला गर्दी केल्यास लाऊडस्पीकरवर सूचना देण्याची सोय आहेच.
पंतप्रधान नरेंद्र मोदीकडून कौतुकाची थाप, इतरांनी धडा घेण्याचा सल्ला -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएमओ इंडिया रिपोर्टकार्डवर महाराष्ट्रातील वर्धासारख्या छोट्याशा शहरातील भाजी बाजारात ज्या पद्धतीने सामाजिक अंतर ठेवले जात आहे. त्यापासून महानगरात (मेट्रो सिटित) राहणाऱ्या लोकांनी धडा घ्यावा असे शब्दात कौतुकाची थाप देत व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओला साडे सात हजार लोकांनी शेअर केला, शिवाय 4 लाखांवर लोकांनी तो पहिला आहे. तर, 5 हजार लोकांनी पसंती दिली आहे.
भाजी बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी या उपक्रमाची चांगली मदत होत आहे. वर्धा जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहेच. या बाजारामुळे हिरव्या मॅटमध्ये सावलीत असणारा बाजार हा तापमानाला लढा देणारा आहे. सोबतच कोरोनालासुद्धा लढा देईल, यात शंका नाही.