वर्धा - जिल्ह्यातील पूलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सात वर्षीय चिमुकलीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. एका पारधी बेड्यावरील ही घटना असून या प्रकारामुळे चांगलीच खळबळ निर्माण झाली.
गुरुवारी मध्यरात्रीची ही घटना असून शनिवारी प्रकार उजेडात आला. पूलगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे.
पारधी बेड्यावरील वेगळ्या राहणाऱ्या कुटुंबाकडे कामावर येणाऱ्या एका व्यक्तीने हे कृत्य केले. गुरुवार रात्री दारूच्या नशेत हा नराधम तिथे आला. यावेळी सात वर्षाची पीडित मुलगी आईजवळ झोपून होती. दारूच्या नशेत असलेल्या मुख्य आरोपी विनोद विठ्ठल वर्भे (35) याने दोघा साथीदारांसोबत जाऊन चिमुकलीला झोपेतच उचलून नेले. बेड्या लगतच्या नर्सरीत या चिमुकलीवर आळीपाळीने नराधमांनी अत्याचार केला. त्यांनतर कृत्य करून तिला सोडून दिले. यावेळी ती पहाटे बेड्यावर पोहचली असता रडत रडत घडलेला प्रकार आईला सांगितला.
एका सामाजिक संस्थेच्या संचालिकेने घेतला पुढाकार....
घटनेनंतर समाजाच्या भीती पोटी कोणाला हाा प्रकार सांगितला नाही. या घटनेची माहिती रोठा येथील पारधी मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेऊन असणारी संचालिका मंगेशी मुन यांना कळला. त्यांनी स्वतः जाऊन कुटुंबाला गुन्हा दाखल करण्यासाठी हिम्मत आणि मार्गदर्शन केले.
पूलगाव पोलिसांना हा धक्कादायक प्रकार कळताच त्यांनी लागलीच सूत्रे हलवली. उपविभागीय महिला पोलीस अधिकारी यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल केला. यावेळी ठाणेदार रवींद्र गायकवाड आणि त्यांच्या पथकाने यात महत्वाची भूमिका घेत आरोपी विनोद वर्भेलसह आणखी एकाला ताब्यात घेतले.
मुलीची प्रकृती ठीक असून या प्रकरणाचा तपास एसडीपीओ तृप्ती जाधव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात, पोलीस कर्मचारी विवेक बनसोड, रवींद्र हाडके, अनिल भोरे, मुकेश वांदिले हे करत आहेत.