वर्धा - स्वर्गात जाण्यासाठी 33 कोटी देवाचे नाव जपले जाते. मात्र यंदा 33 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करा आणि स्वर्गात जाण्याच्या मार्ग सुकर करा, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. आंजी मोठी येथील ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित वृक्ष दिंडीच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते.
आजच्या दुष्काळी परिस्थितीत राज्यात 6778 टँकर सुरू आहेत. मात्र ज्या ठिकाणी जंगल आहेत. तिथे टँकर लावण्याची गरज पडली नाही. जिथे जंगल आहे, तिथे जल आहे, आणि जिथे जल आहे, तिथे भावी पिढीच भविष्य आहे, या शब्दात मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले आहे.
झाडे लावणे हाच स्वर्गात जाण्याचा समृद्धी मार्ग आहे. याचा उल्लेख करताना त्यांनी पद्म पुराणात शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या खंड 58 चा दाखला दिला. 'गडकरीचे नॅशनल हायवे होत आहे, पण स्वर्गात जाण्यासाठी कोणत्याच कॉन्ट्रॅक्टरची गरज नाही, त्यासाठी पिंपळाचे, वडाचे, औदुंबराचे झाडे लावा', असे ते म्हणाले.
दरम्यान मुनगंटीवर यांनी जिल्ह्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. ही शाळा या सत्रापासून सुरू होणार असल्याने शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून 50 लक्ष रुपये जिल्हा वार्षिक योजनेमधून उपलब्ध करुन देण्याची हमी दिली आहे.
'आजपर्यंत अनेक वनमंत्री होऊन गेले पण वृक्ष लागवडीची चळवळ करण्याचे काम केवळ सुधीर मुनगंटीवार करू शकले', असे आमदार अनिल सोले म्हणाले आहेत.
यावेळी मंचावर खासदार रामदास तडस, आमदार प्रा. अनिल सोले, नागो गाणार, रामदास आंबटकर, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वृक्ष दिंडी करणार वृक्ष लागवडीची जणजागृती...
वृक्ष दिंडीचे हे तिसरे वर्ष आहे. यावर्षी ही दिंडी 9 दिवसांचा प्रवास करून नागपूर येथे पोहचणार आहे. या दिंडीसोबत 55 कार्यकर्ते राहणार असून दिंडी रोज 150 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. वृक्ष दिंडी तीन जिल्ह्यामधून जनजागृती करत नागपूरमध्ये पोहचणार आहे.