वर्धा - लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असे ज्येष्ठ मंडळी म्हणत असतात. लग्न केव्हा, कुठे आणि कसे हे ही अगोदरच ठरले असल्याचेही सांगतात. पण वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्याच्या गिरडच्या महादेवाचे लग्न असे झाले की याची प्रचिती सर्वानांच झाली. जोडप्यांचे लग्न अगोरदच ठरले असेल तर मग अडचणी कसल्या गावकऱ्यांनी ठरवले आणि धुम धडाक्यात लग्न करून देत सर्वांसमोर एक आदर्श ठेवले.
महादेव संतोष खंडरे कुटुंबीयांची परिस्थिती जेमतेम वडील अर्धांगवायूने अंथरूणार खिळले असल्यामुळे आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करते. मुलाचे लग्न व्हावे असा विचार त्यांच्या मनात आला. गावातील काही लोकांजवळ त्यांनी आपला विचार बोलून दाखवला. महादेव हा स्वभावाने मनमिळावू असल्याने गावकऱ्यांनी पुढाकार घेत वधूचा शोध सुरू केला. नागपूरच्या बोरगावात हा शोध संपला. मुळच्या गिरडच्या असणाऱ्या रंजना राऊत यांच्या घरचीही परिस्थीती जेमतेमच त्यांची मुलगी रूपालीशी महादेवचा विवाह ठरला. दोघांच्या घरची परिस्थीती अंत्यत हालाकीची असल्यामुळे केवळ दोन हार घालून विवाह करण्याचे ठरले.
मुलाचे लग्न धुमधडाक्यात व्हावे अशी महादेवच्या आईची इच्छा होती. पण, पती अंथरुणात पडून, राहायला चांगला घर नाही. मग लग्न कसे होणार, या विचारात त्या पडल्या होत्या. मग महादेवाच्या लग्नासाठी सर्वात पहिले राम मंदिरचे दार खुले झाले. श्रीराम मंदिर देवस्थान समितीने केवळ मंदिराचे दारच खुले केले नाही, तर गावकऱ्यांना आवाहन करून पैसा जमवला. गावकऱ्यांनीही हाकेला धावून येत एक नवा आदर्श घडवला. महादेवाचा संसार चांगला व्हावा म्हणून गावकऱ्यांनी पडके घर दुरुस्त केलेच आणि दुसरीकडे लग्नाची तयारी सुरू केली.
सोमवारी हा विवाह सोहळा गावाकऱ्यांच्या साक्षीने ठरला. बँड-बाजासह वरात आली. हे सगळे शक्य झाले ते गावकऱ्यांच्या मदतीने. सर्व पाहुणेमंडळी एकमेकांची काळजी घेत होते. लग्न लागले अक्षदा पडल्या मंडळीने जेवणाचा आस्वाद घेतला. जे लग्न दोन फुलांच्या हारावर होणार त्याला गावकऱ्यांनी धूम धडाक्यात साजरे केले.
गावकऱ्यांनी आई-वडिलांच्या भूमिकेत जाऊन आदर्श विवाह घडवून आणला. मनाचा मोठेपणा दाखवत सर्व लग्न संस्कार पार पाडत महादेव आणि रुपालीच्या संसाराची घडी बसवून दिली. गिरड सारखे संवेदनशील गावकरी महाराष्ट्रातील गावा गावाला लाभले पाहिजे. जेणेकरून शेतकरी कुटुंबातील मुलगी हुंड्यासाठी आत्महत्या करणार नाही. लग्नाला पैसे लावून कर्जबाजारी झालेला शेतकरी बाप गळ्याला फास लावणार नाही, अशी चर्चा परिसरात होती.