वर्धा - महागड्या गाड्यांमधून मध्यरात्री अवैध दारू वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात नेल्या जात असल्याची माहिती समुद्रपूर पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी नागपूर महामार्गावरील आरंभा टोलनाक्यावर एका गाडीमधून दारूच्या चार हजार बाटल्यांसह एकूण 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गजानन संगेपवाड (वय 21 रा.बुट्टीबोरी) याला अटक करण्यात आली आहे.
नागपूरहून चंद्रपुरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवरून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरंभा टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनाच्या मागील सीटवर देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या.
हेही वाचा - चंद्रपूर : लाखोंच्या दारू साठ्यावर चालवला रोड रोलर
वाहनासह दारू जप्त करून समुद्रपूर पोलिसांनी पंचनामा केला आहे. जप्त करण्यात आलेला सर्व साठा समुद्रपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे. ही कारवाई समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अरविंद येनूरक, रवी पुरोहित, आशिष गेडाम, वैभव चरडे, सागर वातमोडे यांनी केली.