वर्धा - कोरोनामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस मृत्यूच्या घटना वाढत असल्याने पुन्हा जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले. मात्र यंदा काही नागरिकांनी होकर दिला आहे, तर काहींनी विरोध दर्शवला आहे. जनता कर्फ्यूवर एकमत होत नसल्याने संभ्रमाची स्थिती आहे. व्यापारी संघटनांची बैठक झाली असून राजकीय मंडळीत मात्र एकमत नसल्याने चित्र आहे.
जनता कर्फ्यूच्या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी निवेदन दिले असून त्यांचा कर्फ्युला पाठिंबा आहे. हा जनता कर्फ्यू चार दिवसांचा असणार आहे. शुक्रवार ते सोमवार म्हणजे 18 ते 21 सप्टेंबर हा जनता कर्फ्यू असण्याची शक्यता आहे. यावर सर्वांचे एकमत झाल्यास संचारबंदी पाळण्यात येईल. मुळात जनता कर्फ्यू हा सामान्य नागरिकांची मागणी की, व्यापारीवर्गाची असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. या कर्फ्यूला काही राजकीय पक्षांनी समर्थन दर्शवले आहे. यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह शेखर शेंडे, एमआयडीसीचे अध्यक्ष प्रवीण हिवरे, किसान अधिकार अभियांचे अविनाश काकडे यांनी या कर्फ्यूच्या सामान्य लोकांचे नुकसान होणार असल्याचे म्हटले. यामुळे जनता कर्फ्यूला विरोध झाला आहे. तर, भाजपाच्या वतीने समर्थन दर्शवण्यात आले आहे.
यात जिल्हा प्रशासनाकडे अधिकार नसल्याने हे केवळ जनतेच्या हातात असल्याचे सांगितले जात आहे. जनतेने पाळला तर, जनता कर्फ्यू यशस्वी होऊ शकेल, असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. आज दिवसभरातील घडामोडींवर पुढील निर्णय येण्याची शक्यता आहे. यापूर्वी दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूला लोकांनी प्रतिसाद दिला नसल्याने नागरिक खरेच जनता कर्फ्यूच्या समर्थनात आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.