वर्धा - मास्क न लावल्याने दंड भरण्यास सांगितलेल्या युवकांनी चक्क आर्वीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांत चांगलीच खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेतलले असून यातील एक जण हा अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे.
वर्धा जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबवली जात आहे. याच दरम्यान आर्वीच्या शिवाजी चौकात विनामास्कविरोधी मोहिमेची पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक हे पाठकासोबत गेले. यावेळी शिवाजी चौकात एका दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांपैकी एकाने मास्क घातलेला नव्हता. त्यामुळे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी ओळख सांगत विनामास्कविरोधी कारवाईबाबत माहिती दिली. यात आवेश खान जाबीर खाँ पठाण असे एका आरोपीचे नाव आहे.
चक्क एसडीओना मारहाण -
यावेळी एसडीओ यांनी मास्क घातला नसल्याने युवकांला दंड भरण्यास सांगितले. मात्र, त्याने अचानकपणे शिवीगाळ करत उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना मारहाण केली. यावेळी सोबतच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत दोघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. मारहाणीत जखमी झालेले उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. एकाचे नाव आवेश खान जाबीर खाँ पठाण असे असून दुसरा एक जण अल्पवयीन आहे. आर्वी पोलीस पुढील तपास करत आहेत.