वर्धा - सेलू तालुक्यातील केळी शिवारात विद्युत तारेच्या स्पार्किंगमुळे दोन एकरातील ऊस जळाला आहे. यात शेतकऱ्याचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.
संजय चलाख (रा. येळाकेळी) असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. चलाख यांचे मौजा केळी शिवारात शेत आहे. यात २ एकरात त्यांनी ऊसाची लागवड केली. मोठे कष्ट घेत त्यांनी ऊसाचा मळा तयार केला. मात्र, शेताच्यावरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीने होत्याचे नव्हते केले.
..अशी आग लागल्याची चर्चा
तारांवर पक्षी बसून तारांमध्ये झालेल्या घर्षणांमुळे स्पार्किंगची ठिणगी शेतातील ऊसावर पडली. याच ठिणगीने दोन एकरातील ऊस पूर्णतः जळून कोळसा झाल्याची चर्चा आहे. शेतावरील तारांबाबत चलाख यानी तक्रार देखील केली होती. मात्र, विद्युत वितरण कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले होते. आता विद्यूत कंपनीच्या दुर्लक्षाने घडलेल्या या घटनेमुळे चलाख यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
हेही वाचा- उन्हाळी पीक घेणाऱ्यांसाठी पाणी आरक्षित ठेवा, पालकमंत्री केदार यांच्या सूचना