वर्धा- नागपूर अमरावती महामार्गावरील कारंजा(घाडगे) येथे पहाटेच्या सुमारास जनावरे घेऊन जाणाऱ्या मालवाहूचा वाहनाचे चाक तुटुन अपघात झाला. मात्र, या अपघातामुळे अवैधरित्या कत्तलखाण्याकडे जाणाऱ्या ११ जनावरांचा जीव वाचल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर वाहनचालक मात्र, गाडी सोडून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जनावरांवर उपचार करून गोशाळेकडे रवाना करण्यात आले आहे.
नागपूर कडून अमरावतीच्या दिशेने ११ गोवंश जनावरांना मालवाहु वाहनात कोंबून कत्तलखाण्याकडे नेत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनेनंतर वाहन चालक पसार झाला आहे. कारंजा पासून पुढे मालवाहूच्या डाव्या बाजूचे चाक हे तुटून पडले. यामुळे गाडी जागेवर थांबली. मात्र, हन चालक भीती पोटी पसार झाला. स्थानिकांना मालवाहू गाडी दिसताच त्यांनी कारंजा पोलिसांना माहिती दिली.
जनावरांनवर केले उपचार
या ठिकाणी जनावरांची प्रकृती गंभीर असल्याने जनावरांनवर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने उपचार करण्यात आले. तसेच जखमी जनावरांवर मलमपट्टी करण्यात आली.
वाहनचालकाचा शोध सुरू
वाहन चालक घटनेनंतर वाहन सोडून पसार झाला. त्यामुळे हे जनावर कुठून आणले आणि कुठे जात होते हे कळू शकले नाही. त्यामुळे वाहन चालकाचा शोध घेतला जात असून जनावरांना तिवसा येथील गो शाळेत पाठवणार असल्याची माहिती करंजाच्या ठाणेदार राजेंद्र शेटे यांनी दिली.
रात्रीच्या वेळी गोवंश तस्करीत वाढ
नागपूर-अमरावती महामार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. याच वर्दळीचा आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जनावरांची तस्करी केली जात आसल्याचा संशय व्यक्त होत आहे. या मार्गाने गोवंश मास विक्रीवर बंदी असली तरी जनावरांना कत्तलखान्याकडे नेले जात असल्याचे बोलले जात आहे. आज चाक तुटल्याने ११ जनावारांचा जीव वाचला. मागील महिन्यात तळेगाव पोलीस ठाण्या अंतर्गत अशाच प्रकारे वाहन बिघडल्याने मालवाहू वाहन जनावरांसह सापडले होते. या घटनांवरून ही वाहतूक चोरट्या मार्गाने होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.