वर्धा - हिंगणघाट नगरपरिषदच्या १० नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते मुंबईत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला. यात ९ भाजपचे नगरसेवक तर एक अपक्ष नगरसेवकांनी पक्ष सोडला आहे. यासोबतच दोन राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अश्या १२ जणांणी सेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख अनंत गुढे यांचे नेतृत्वात भाजपा नगरसेवक मागील काही महिन्यांपासून संपर्कात होते. अखेर पक्ष प्रवेश झाल्याने चर्चेला विराम बसला असून भाजपमध्ये मात्र खिंडार पडली.
पक्षातील धुसपुस पक्षांतराने पुढे आली -
हिंगणघाट येथील नगर परिषदेचे ३८ नगर सेवकांचे संख्याबळ आहे. यात सर्वाधिक नगरसेवक आणि नगराध्यक्ष असे ३० जण भाजपचा असल्याने सत्ता भाजपकडे आहे. यात राष्ट्रवादीचे चार तर अपक्ष तीन नगर सेवक होते. एकेकाळी शिवसेनेचे माजी मंत्री राहिलेले अशोक शिंदे यांनी शेतकरी नेते शरद जोशींचा पराभव केला. पण मध्यंतरीच्या काळात सेनेची ताकद कमजोर झाली. सेनेचा केवळ एकच नगर सेवक निवडून आला. पण आता मात्र या झालेल्या प्रवेशाने नक्कीच सेनेचे ताकद वाढणार आहे. याचा फटका भाजपला किती बसेल हे सांगता येणार नसेल तरी झटका बसणार हे नक्कीच. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली ही धुसपुस पक्ष प्रवेशाने पुढे आली आहे.
यांच्या उपस्थितीत यांनी बांधले शिवबंधन -
पक्ष प्रवेश होताना मुख्यमंत्री यांच्यासह मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर, वर्धाचे संपर्क प्रमुख अनंत गुढे, जिल्हा प्रमुख अनिल देवतारे, बालू शाहगडकर, वर्धा जिल्हा युवा सेना प्रमुख अभिनंदन मुणोत यांची उपस्थिती होती. भाजपच्या नऊ नगरसेवकानी भाजपचे कमळ सोडून शिवधनुष्य हाती घेतले. यात माजी नगराध्यक्ष, भाजपचे विद्यमान नगरपालिका उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, नगरसेवक सतीश धोबे, भास्कर ठवरी यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
हेही वाचा - जळगावनंतर मुक्ताईनगर नगरपंचायतीत भाजपला धक्का? 6 नगरसेवक हाती शिवबंधन बांधणार