वर्धा - विदर्भात पडलेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला असला तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आणलेली तूर पावसामुळे भिजली आहे. तर आर्वी आणि देवळी तालुक्यातील अनेक लोकांच्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत तर अनेकांच्या घराचे छत पडले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती विक्रीसाठी आणलेल्या तुरी पावसाच्या पाण्यात भिजल्या. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसणार असल्याने अस्मानी संकटाने पुन्हा घात केला अशी म्हणायची वेळ आली. कुठलीही व्यवस्था नसल्याने तोंडाशी आलेला घास पुन्हा हिसकवल्या गेला.
अचानक आलेल्या वादळाने देवळी येथील वार्ड क्र. 1 मधील अनेकांच्या घरावरील टीनाचे छत उडाले. तर गजानन मगर यांना नुकतेच पंतप्रधान आवास योजनेतून मिळालेले घरकुलही वादळी वाऱ्यात कोसळले. सुरेश धुमाळ, बारकु शिंदे, रमेश नेहारे, गजानन मगर, संदीप शेंडे, छाया धोंगळे,शंकर डोंगरे, संदीप शेंडे, अनिल शेंडे अशी नुकसान झालेल्या कुटुंबीयांची नावे आहे. आर्वी तालुक्याच्या तळेगांव येथे सुद्धा 10 ते 12 घरांचे वादळी वाऱ्याने नुकसान झाले आहे.