वर्धा - सर्वत्र नववर्षाची सुरुवात जल्लोषात करण्यात आली. मात्र, या वर्षीची सुरुवात ही शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाने झाली. सुलतानी संकटाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. गुरुवारच्या पहाटे तासभर बरसलेला अवकाळी पावसाने 2 तालुक्यात 18 हजार हेक्टरवरी पिकांचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात आर्वी आणि कारंजा तालुक्याच्या गावांचा समावेश आहे. यानंतर आमदार दादाराव केचे यांची प्रशासकीय यंत्रणेसोबत जाऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली. हेक्टरी 25 हजार रुपये तात्काळ देण्याची मागणी आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी केली.
जिल्ह्यातील सर्वच भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात आर्वी, कारंजा तालुक्याला पावसासह गारपिटीने झोडपून काढले. बोरीच्या आकाराची पडलेली गार पिकांसाठी कर्दनकाळ ठरली. आर्वी तालुक्यातील 22 ते 25 गावातील 18 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर कारंजा तालुक्यातील 188 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. यात कारंजात राहटी, काजळी, डोंगरगाव धानोली, उमरविहरी, या भागात नुकसान झाले असल्याची माहिती, आर्वीचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी दिली.
हेही वाचा - रेल्वेबाबतच्या सर्व तक्रारींसह मदतीकरता 'हा' असणार एकच क्रमांक
संत्रा झाडावरून गळून पडला आहे. दिवस उजडताच शेतातील हे चित्र डोळ्यात अश्रू आणणारे ठरले. आर्वी तालुक्यातील बाळा जगताप यांच्या शेतातील विक्रीला तयार असलेले केळीचे घड जमिनीवर पडले. भाव नसल्याने बाजारात विकू शकले नाही. मात्र, अवकाळी गारपिटीने 25 लाखाचे नुकसान झाले असल्याचे, या शेतकऱ्याने सांगितले. अगोदर खरिपात अतिवृष्टीने पीक गेले होतेच आता अवकाळी पावसाने कापूस भिजला. यामुळे बाजारात विक्रीसाठी लागणारा दर्जा खराब झाला. अशीच परिस्थिती गहू, हरभरा, संत्रा, भाजीपाला वर्गीय टोमॅटो यासह अन्य पिकांचे नुकसान असल्याचे कारंज्याचे शेतकरी भूपेश बारंगे यांनी सांगितले. आता डिसेंबर अखेर थंडी पडायला सुरुवात झाली.
हेही वाचा -शहरी नक्षलवाद्यांकडूनच सीएएचा विरोध - विनय तेंडुलकर
तुरीचे पीक कालपर्यंत पिवळ्या फुलांनी सजलेले होते. मात्र, गारपिटीने जमिनीवर लोळण घातल्याने तेही हाताचे गेले. सुरूवातीला अतिवृष्टीमुळे पीक घरात आले नाही.
गुरुवारच्या पहाटे काही तासातच गारपिटीने पीक मोडून पडले. यंदा एकही पीक शेतातून घरी आले नाही. सुरूवातीला अतिवृष्टीने नुकसान होऊन मदत मिळाली नाही. तेच हाल पुन्हा या गारपिटीने नुकसान झाले. यामुळे पीक कर्ज माफ होईल तेव्हा होईल. मात्र, आता शेतकऱ्यांनी जगावे कसे? असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
पहिल्या टप्प्यात प्राथमिक अहवालात 18 हजार 188 हेक्टरवरील पिकांचे नुकसान गारपीटीमुळे झाले. यात शेतनिहाय सर्वेक्षण झाल्यास नुकसानीचे हेक्टरवरील जमीन वाढणार आहे. यामुळे एकही पीक शेतकऱ्याच्या हाती न आल्याने नुकसान भरपाई शिवाय न मिळाल्यास जगावे कसे असा सवाल उपस्थिती केला जात आहे.