वर्धा - घरात गॅस जोडणी नसल्याने ग्रामीण भागात स्वयंपाक खोलीतून धूर निघतानाने दृश्य सर्रास पाहायला मिळते. त्यामुळे जिल्ह्याला धूरमुक्त करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पाऊले उचलली जात आहेत. यासाठी प्रशासनातर्फे केरोसीन मुक्त, धूरमुक्त ही संकल्पना राबवून गॅस जोडणी दिली जाणार आहे.
शहरी भागात जरी गॅस जोडणी झाली असली, तरी ग्रामीण भागात मात्र आजही चुलीचा उपयोग होताना दिसत आहे. गॅसची महागाई पाहता लोक चुलीचा उपयोग करतात. यामुळे ग्रामीण भागात अनेक घरातून धूर पडतो. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर तर होतोच, शिवाय पर्यावरणालाही त्याचे नुकसान होते. धूरामुळे पर्यावरण आणि लोकांच्या जिवाला होणाऱ्या धोका लक्षात घेऊन प्रशासनाकडून जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी शिधापत्रिका धारकांना गॅस जोडणी देण्याचा उपक्रम राबविला जात आहे.
या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याला धूरमुक्त करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून होणार आहेत. यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मागेल त्याला गॅस जोडणी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३४ हजार ९८१ शिधापत्रिका धारकांकडे गॅस जोडणी उपलब्ध नसल्याने शासनाकडून त्यांना गॅस जोडणी देण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये ३ लाख ३२ हजार ७०६ जणांकडे गॅस जोडणी आहे. या गॅस जोडणी उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड यांनी केला आहे.