वर्धा - सेलू तालुक्यात अंगावर काटा आणणारी घटना घडली होती. यात बोरखेडी येथील पूर्वा गडकरी या चिमुकलीला तिच्या गळ्यात गुंडाळी घालून बसलेल्या सापाने दंश केला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या पूर्वाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सेवाग्राम रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ तथा विभाग प्रमुख डॉ. मनीष जैन यांनी दिली आहे. खासदार रामदास तडस यांनी देखील रुग्णालयात जाऊन मुलीची प्रकृती जाणून घेत आर्थिक मदत केली.
हेही वाचा - आर्वीतील रुग्णालयामध्ये प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू; डॉक्टरवर हलगर्जीपणाचा आरोप
सेलू तालुक्यातील बोरखेडी (कला) येथील पूर्वा गडकरी ही शनिवारी मध्यरात्री झोपेत असताना तिच्या गळ्यात विषारी सापाने फणा काढून ठिय्या मांडला होता. पूर्वा दोन तास स्तब्ध राहिली. शेवटी हालचाल करताना पूर्वाला सापाने दंश केला. दोन तास चाललेल्या या घटनेचा व्हिडिओ अनेकांचा काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. विषारी साप असल्याने तिला लागलीच सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी विषारी साप डसल्याचे निदान करत उपचार सुरू केला. 24 तास लोटले असून सध्या ती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे.
आणखी तीन, चार दिवस देखरेखेची गरज
यात विषारी सापाच्या दंशानंतर कधीकधी विपरीत परिणाम तीन ते चार दिवसांनंतर उद्भवतात. त्यामुळे, दंश झालेल्या मुलीच्या प्रकृतीवर पुढील तीन ते चार दिवस लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सर्पदंश झाल्याच्या जागी सध्या सूज आहे. याबाबत सर्जनचा सल्ला घेण्यात आला असून मुलीवर उपचार सुरू आहे, अशी माहिती डॉ. मनीष जैन यांनी दिली.
नात म्हणून लागेल ती मदत करणार - रामदास तडस
या संदर्भात माहिती मिळताच खासदार रामदास तडस यांनीही सेवाग्राम रुग्णालयात जाऊन मुलीच्या प्रकृतीची विचरपूस करत कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली. त्यानी कुटुंबीयांना धीर दिला. साप गळ्यात असताना सात वर्षांच्या पूर्वाने ज्या हिमतीने कुठलीही हालचाल न करता दोन तास झुंज दिली यासाठीही तिचे कौतुक केले. नात म्हणून काहीही अडचण असल्यास मदत करणार, असे सांगत गडकरी कुटुंबीयांना आश्वस्त केले.
हेही वाचा - वर्धा : वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; नंदोरी परिसरातील घटना