वर्धा - कोरोनामुळे सण उत्सवासह धार्मिक कार्यक्रमावर निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे 800 वर्षांत कधीही खंड न समुद्रपूरच्या गिरड येथील फरीद बाबाचा उर्स उत्सव शांततेत पार पडला. हिंदू-मुस्लीम धार्मिक एकात्मचे प्रतीक असलेल्या दर्गाहवर हजारो भाविक येतात. पण, यंदा ट्रस्टच्या तीन लोकांच्या उपस्थिती उर्सचे कार्यक्रम साध्या पद्धतीने पार पाडण्यात आला.
विदर्भात हिंदू-मुस्लीम कुटूंबात बाबा फरीद हे अनेकांचे कुलदैवत म्हणून पुजले जातात. उर्सच्या निमित्ताने हजारो भाविक न चुकता दरवर्षी उर्सला येतात. मात्र, यावर्षी प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळ बंद ठेवले आहे. टेकडीकडे वाहनाने जाणारा मार्ग बॅरिकेट लावून बंद ठेवण्यात आला. त्यामुळे आलेल्या अनेक भाविकांनी टेकडीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. गावातील जाणकारांनी मात्र पायी मार्गानी टेकडीवर जाऊन बाबा फरीद दर्गाहवर जाऊन दुरुन दर्शन घेतले.
गिरड येथील दर्गाह ही हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाते. विदर्भातील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. उर्सनिमित्त संपूर्ण विदर्भातून हजारो नागरिक येत असतात. संपूर्ण परिसर रोषणाईने लखलखतो. पण, यंदा ना रोषणाई ना उत्सव साजरा करण्यात आला. उर्सच्या निमित्ताने अगोदरच्या रात्री भावीक एकत्र येतात. रात्रभर कव्वाली, धार्मिक उत्सव चालत असून नागरिक जागरण करतात. सकाळी दर्गाहवर झेंडा लावला जातो. कोरोनामुळे यंदा उर्स रद्द करत बुधवारी (दि. 26 ऑगस्ट) सकाळी ट्रस्टच्या अवघ्या तीन लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष करीमुद्दीन काजी यांनी दिली.
हेही वाचा - वर्ध्यात प्रहारने कृषी अधीक्षकांच्या खुर्चीला सोयाबीन रोपांसह दिले निवेदन