वर्धा- अष्टभुजा चौकातील शब्बीर अली अब्बास अली सय्यद यांच्या मालकीच्या आरा मशीनला पहाटेच्या सुमारास आग लागली. आगीमध्ये आरा मशीनसह मोठ्या प्रमाणात सागाचे लाकूड जळून खाक झाले आहे. काही नागरिकांनी ही आग दिसताच आरा मशीनच्या मालकांना याबद्दल माहिती दिली. यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले.
पाण्याचा मारा केल्यानांतर दोन ते तीन तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. आगीचे मुख्य कारण हे शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात आहे. या आगीत आरा मशीन परिसरात असलेले लाकूड हे सागवानाचे असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा मोठा आहे.
आगीने रौद्र रुप धारण केल्याने आग पसरत लगतच्या दोन घरांमध्ये सुद्धा पोहोचली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नगराध्यक्ष अतुल तराळे आणि रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पाण्याचा मारा करत कुलिंग करण्याचे काम अग्निशामक दलाकडून केले जात आहे.