वर्धा - जिल्ह्यातील सोनेगाव राऊत येथे आज सकाळी विजेच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोहर बुरीले (वय 70) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतातील वीज पंप सुरू करत असताना ही घटना घडली. शनिवारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्या होत्या. त्यामुळे मोटर पंपच्या पेटीमध्ये विद्यूत प्रवाह उतरल्याने बुरीले यांचा करंट लागून मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
आजनसरा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले सोनेगाव राऊत येथे शनिवारी वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. यात अनेक ठिकाणी विद्युत खांब तुटले तसेच शॉर्ट सर्किट झाले. यामुळे गावातील अनेक भागात विद्युत लाईनमध्ये बिघाड झाला. यात रविवारी सकाळी मनोहर बुरीले हे शेतात गेले होते. जनावरांना पाणी पाजायचे असल्याने मोटर पंप चालू करण्यासाठी त्यांनी पेटीला हात लावताच त्यांना जोरदार विजेचा झटका बसला. त्यानंतर मुलगा नरेशला माहिती पडताच त्याने शेताकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता.
अगोदरच्या दिवशी झालेल्या विद्युत लाईनमधील बिघाड मनोहर बुरीलेंच्या जीवावर बेतला. शेतात ज्या मोटरपंप पेटीला हात लावला त्याला विद्युत तारांचा स्पर्श झाला असल्याचे पुढे आले. हे त्यांना माहीत न पडल्याने नेहमी प्रमाणे मोटर सुरू करण्यासाठी पेटीला हात लागताच त्यांचा करंटमुळे जागेवरच मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे.
यानंतर विद्युत वितरण कंपनीचे अभियंता अश्विन चित्तवार यांनी भेट दिली. वडनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष गजभिये यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शव विच्छेदनसाठी वडनेर येथे ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. मनोहर बुरीले यांचा मागे पत्नी, तीन मुल आणि एक मुलगी असा परिवार आहे.