वर्धा - कर्जमाफी ऑनलाईन करण्यात आली. कर्जमाफी हवी असेल तर बायकोला घेऊन यावे, अशी अटही घालण्यात आली. यावर मुख्यमंत्री आणि माझा वाद झाला. ऑनलाईन तारखा बदलल्या आणि तेवढ्यात त्यांचे बायकोसोबत बिघडले, तर काय? मुकला न तो कर्जमाफीला, असा सवाल करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारची चांगलीच खिल्ली उडवली. मुख्यमंत्र्यांना सरकार चालवायची अक्कल नाही, अशा बोचऱ्या शब्दात त्यांनी टीकाही केली.
संपूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी इथं क्लिक करा
जिल्ह्यातील आष्टी येथे महाआघाडीच्या उमेदवार चारुलता टोकस यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
धनंजय मुंडे यांनी २०१४ पासून पेट्रोल, डाळ आणि सिलेंडर यावर झालेल्या भाववाढीचा हिशोब काढा आणि तो हिशोब पाहून झोप लागली तर मला सांगा, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी पेट्रोल दरवाढीबद्दल बोलताना त्यांची जीभ घसरली. तसेच सरकारच्या महंगाईच्या नाऱ्यावर त्यांनी चांगलीच टोलेबाजी केली.
फडणवीस म्हणतात, की भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवू. मी १६ मंत्र्यांचे ९० हजार कोटी रुपयांचे घोटाळे हे पुराव्यानिशी सभागृहात सादर केले. यापैकी एक जरी पुरावा खोटा निघाला तर केंद्रात तुमचे सरकार आहे. तसेच राज्यात तुमचे सरकार आहे. कुठल्याही चौकात फाशी द्या, असे आव्हानही केले. मात्र, त्यावर काहीच उत्तर मिळाले नाही, असे ते यावेळी म्हणाले.
मोदी बाबांचे काही सांगता येत नाही. देश लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे नेत आहेत. तुमच्या माझ्या दुर्दैवाने हे देशाचे पंतप्रधान आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ नोटबंदी केली. तसेच हे पुन्हा निवडून आल्यास टीव्हीवर प्रकट होतील आणि 'मेरे प्यारे देशवासियों इसके आगे चुनाव बंद' अशी घोषणा करतील, अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली.