वर्धा - बसस्थानक प्रमुखाने वाहकाला आजीच्या अंत्यविधीसाठी सुट्टी न दिल्याने वाहकाने चक्क आजीची अंत्ययात्रा रामनगर येथील आगारात आणली. त्यामुळे काही काळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर प्रकारची माहिती आगार व्यवस्थापकाला देत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
वर्धा आगारात विवेक गाडेगोणे वाहक म्हणून कार्यरत आहे. यांची आजी तानाबाई गोडेगोणे यांचा वृद्धापकाळाने सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घरी मृत्यू झाला. त्यावेळी विवेक गाडेगोणे कर्तव्यावर होते. याची माहिती कळताच सुट्टी मिळावी म्हणून बसस्थानक व्यवस्थापक सचिन गोठाने यांना विनंती केली. मात्र त्यांनी अगोदर कर्त्यव्यावर जाण्यास सांगितले. वाहक विवेक यांनी अंत्यविधीला वेळ असल्याने हिंगणघाटसाठी गाडी घेऊन गेले. साडे तीन वाजताच्या सुमारास मात्र परत आल्यावर सुट्टी मागितली असता गोठाने यांनी सुट्टी न दिल्याचा आरोप विवेक यांनी केला.
अखेर विवेक घरी निघून गेले. यावेळी मात्र संताप व्यक्त करण्यासाठी आजीचा स्वर्गरथ हा मोक्षधामकडे न नेता रामनगर आगारात आणण्यात आला. सदर प्रकार कळताच इतर वाहक चालक हे सुद्धा बाजूने उभे राहत आगार वव्यवस्थापक समोर व्यथा मांडली. यासंदर्भात आगार प्रमुख पल्लवी चोखट यांनी इटीव्ही भारत सोबत बोलतांना सांगितले की कारवाईचे अधिकार विभागीय नियंत्रकांना आहेत. याबाबत तक्रार आल्यानंतर प्रकरण वरिष्ठांकडे उद्या पाठवले जाईल.