वर्धा - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या दर वाढीत राज्यात वर्धा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारपासून सायंकाळी 7 नंतर बाजार पेठ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत. तसेच कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आतापासून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
या आदेशान्वये कोणत्याही कार्यक्रमाकरिता संबधित कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. मिरवणूक आणि रॅली काढण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी म्हटले आहे.
लस आल्याचा बिनधास्त पण भोवणार, वेळीच काळजी घ्या
मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिंकामध्ये निर्धास्तपणा दिसून येत आहे. यामुळे विना मास्क, सामाजिक अंतर यासारख्या बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे. पण पुढील धोका टाळण्यासाठी काळजी घेण्याची आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केली आहे.