वर्धा - जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. समुद्रपूर तालुक्यात झालेल्या गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, चवळी, हरभरा, याचबरोबर भाजीपाला जमीनदोस्त झाला आहे. या गारपीटीमुळे शेतकऱयांच्या होळी सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
समुद्रपूर तालुक्याच्या काही भागाला गारपीटीने जोरदार तडाखा दिला. गिरड, वायगाव(गोंड), परिसरातील धामणगाव, खुर्सा पार, रामनगर, परसोडी, निरगुडी, कांढळी, कुर्ला, उमरी आदी गावशिवार गारपीटीने झोडपून काढला. निरगुडी येथील निलेश धोटे यांच्या अंदाजे ३ एकर शेतातील हरभरा आणि गहू होत्याचा नव्हता झाला. गहू जमीनदोस्त झाला तर हरभऱ्याच्या गाठ्या तुटुन जमिनीवर पडल्या. या गावातील २५ ते ३० शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे धोटे यांनी सांगितले.
शेतकऱयांच्या हातातोंडात आलेला घास गारपीटीने हिसकावून घेतला आहे. गणेश विठ्ठल चौधरी हा रामनगर येथील तरुण शेतकरी आहे. त्याने शेतामध्ये चवळी, भेंडी आणि मेथीची लागवड केली होती. सगळी पीके जोमात होती. चवळीची पहिलीच तोडणी झाली होती. बाजारामध्ये माल नेण्यास सुरुवात झाली होती. अचानक सायंकाळी सोसाट्याचा वारा आला आणि त्यानंतर गारा पडल्या. गारपीटीने संपुर्ण पीक उद्ध्वस्त झाले आहे. गारपीटीने पूर्ण पीकच मातीमोल केले. यामध्ये हजारोंचे नुकसान झाले.
रामनगर येथील नंदकिशोर कुडे यांच्या शेतातील टोमॅटोचे नुकसान झाले. मिरची, लसूण, कांदे, सांबार या पिकांचेही गारपीटीत मोठे नुकसान झाले. सर्व पिकांवर खर्च झाला. मात्र, पीक हातात यायच्या काळात नुकसान झाले. आता हे नुकसान कसे भरून निघणार हा प्रश्नच आहे. यंदा अल्प प्रमाणत झालेल्या पावसाने खरीप हंगामाला फटका बसला. यात रब्बीचे पीक बहरले होते. चार पैसे पदरी पडतील अशी आशा होती. मात्र निसर्गाच्या प्रकोपाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास पुन्हा हिरावला.