वर्धा - कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. मात्र यासोबत तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना आरोग्य सुविधा कमी पडू नये यासाठीच देवळी आणि पुलगाव शहरात वसतीगृहामध्ये बदल करून कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. माजी मंत्री रणजित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हे सेंटर तयार करण्यात आले आहे.
वसतिगृहाचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर
देवळी आणि पुलगाव इथल्या दोन्ही वसतिगृहात हे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रात 100 बेडची सुविधा असून सध्या प्रत्येक सेंटरमध्ये 40 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे डॉक्टरसह आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, कोविड प्रोटोकॉलनुसार औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहे. देवळी आणि पुलगाव येथील लोकसंख्या आणि सध्याची रुग्णसंख्या पाहता, येणाऱ्या काळात रुग्णसंख्या वाढल्यास ऑक्सिजन बेडेडची गरज निर्माण होऊ नये. यासाठी कोविड सेंटरमध्ये अतिरिक्त बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी देवळी परिसरात ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
रुग्णवाहिकाही करण्यात आल्या उपलब्ध
कोविड केअर सेंटरमध्ये देवळीच्या संगम ओटू प्लांटकडून ऑक्सिजन उपलब्ध करण्यात येणार आहे. रुग्णांवर उपचार मोफत केले जाणार असून रुग्णांना दोन वेळेचे जेवण, चहा, नाश्ता आमदार कांबळे मित्र परिवाराकडून दिला जाणार आहे. यासोबत देवळी कोविड सेंटरसाठी दोन तर पुलगाव कोविड सेंटरसाठी एक रुग्णवाहिकासुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
हेही वाचा - राज्यात 'हागणदारीमुक्त' नंतर आता होणार 'कोरोनामुक्त' गाव स्पर्धा, ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा