वर्धा - लॉकडाऊनमध्ये इतर राज्यांत किंवा जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना दिलासा म्हणून वर्ध्यात येण्यास परवानगी दिली जात आहे. या काळात बाहेरून आलेल्या व्यक्तीसह कुटुंबातील सदस्यांना गृह विलगीकरणात ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, आर्वी येथील एक कुटुंब या नियमांचे उल्लंघन करत सर्रासपणे बाहेर फिरले आहे. आता या कुटुंबातील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर नियमांचे उल्लंघन केल्याने या कुटुंबावर गुन्हा दाखल करत 40 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आर्वी शहरात अकोला येथून एक महिला एका महिन्याच्या बाळासह माहेरी आली. यामुळे, या कुटुंबाला गृह विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काही दिवसांत ही महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान कुटुंबातील लोक बाहेर फिरल्याने अनेकांच्या संपर्कात आल्याचेही समोर आले.
सदर कुटुंब चार भावंडांचे असून त्यांचा पूर्ण परिवार एकाच इमारतीत राहतो. त्यांचे व्यवसाय वेगळे असले तरी घर एकच आहे. यातील एका भावाची बेकरीदेखील आहे. याच गृह विलगीकरणाच्या काळात त्यांनी बेकरी उत्पादनसुद्धा सुरु ठेवले. यामुळे या कुटुंबातील चारही जणांविरुद्ध कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यासह प्रतिव्यक्तीप्रमाणे 40 हजाराचा दंड भरणा करावा अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले.
नियम मोडून लोकांचे जीव धोक्यात टाकू नका -
बाहेर जिल्ह्यातून आल्यावर कोरोनाची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. त्यामुळे संबंधित व्यक्तीने कुटुंबासह गृह विलगीकरणात राहावे असे सांगितले जाते. कारण व्यक्ती कुटुंबात राहत असल्यास इतरांच्या संपर्कात येऊन कोरोना संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरू शकतो. यामुळे, नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी केले. यासह नियम मोडल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.