वर्धा - महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा संदेश देत सेवाग्राम गावाची वाट धरली. रामराज्याप्रमाणे त्यांनी ग्रामराज्य हा नवीन शब्द आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणे म्हणजे स्वातंत्र्य नाही. गांधीजींना बघण्यासाठी खेड्या पाड्यातील लोक गर्दी करायचे. त्या खेड्या पाड्यातील लोकांना विकास म्हणजे त्याचे आयुष्य सुखा-समाधानाने आनंदाने जगात यावे, म्हणून स्वातंत्र्य पाहिजे होते. यासाठी महात्मा गांधींच्या ग्राम स्वराज्याच्या संकल्पनेची आज गरज आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. महात्मा गांधीजीच्या 151व्या जयंती आणि सप्ताहानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते ऑनलाईन माध्यमातुन बोलत होते.
सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या भव्य सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन तथा पालकमंत्री सुनील केदार, आमदार रणजित कांबळे उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, काळ कोणासाठीच थांबत नाही. मात्र, काळाला आपल्या कामातून दखल घ्यायला लावणारे थोर व्यक्तिमत्व महात्मा गांधी होते. स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात याच सेवाग्रामच्या भूमीतुन झाली आहे. त्या काळी तेव्हा कुठले तंत्रज्ञान, सोशल मीडिया नव्हता. मात्र, स्वातंत्र्य संग्रामाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे काम महात्मा गांधींनी केले. महात्मा गांधी एखाद्या ठिकाणी जाणार असेल असे कळले तरी तिथे प्रचंड गर्दी व्हायची, असे प्रबोधनकार ठाकरे आजोबा सांगायचे, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
जगभरातून लोक येतात. महात्मा गांधींकडे आकर्षले जातात. प्रत्येक जण येथे येण्याचा प्रयत्न करतो. स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत महत्वाचे स्थान असणाऱ्या आश्रमाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळण्यासाठी नक्की प्रयत्न करणार, असल्याचे त्यांनी सांगितले. कुठलेही शस्त्र हातात न घेता स्वातंत्र्य लढ्याचे युद्ध जिंकले. महात्मा गांधीजींचे सेवाग्राम आश्रमाला जागतिक दर्जाचे प्रेरणा केंद्र म्हणून लौकिक मिळवून देऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच कोरोनामुळे येऊ शकलो नसलो तरी लवकरच सेवाग्राम आश्रमाला भेट देण्याची इच्छासुद्धा त्यांनी या माध्यमातून व्यक्त केली.
सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच सेवाग्रामला नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या अभ्यासक आणि पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सुनील केदार यांनी सांगितले. इंडस्ट्रियल आणि मोटर वाहन यांच्यापासून हे दोन शिल्प साकारल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच येथील बेरोजगारांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एमगिरीच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे, आमदार रणजित कांबळे, वित्त व नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी विवेक भिमानवार, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी सत्यजित बडे, सेवाग्रामच्या सरपंच सुधाच्या ताकसांडे आदी, मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमाला वर्ध्याचे खासदार रामदास तडस आणि आमदार पंकज भोयर हे गैरहजर होते.