वर्धा - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निवडणूक जाहीरनाम्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच फिरकी उडवली. विरोधकांनी जाहीरनाम्यात जगातील अशी सर्व आश्वासने दिले जी कधीच पूर्ण करता येणार नाहीत. त्यात फक्त प्रत्येकाला ताजमहाल बांधून देऊ आणि चंद्रावर एक प्लॉट देऊ हे दोनच मुद्दे सुटले असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या जाहिरनाम्याची फिरकी उडवली आहे. ते कारंजा येथे भाजप-महायुतीचे उमेदवार माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
हेही वाचा - औरंगाबाद शहराच्या नावाला हात लावला तर याद राखा - अबू आझमी
यावेळी, विरोधक आणि शरद पवार यांची परिस्थिती ही शोले चित्रपटातील जेलरसारखी झाल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले, यंदा निवडणुकीत मजा नाही. त्याचे कारण म्हणजे विरोधकांनी पराभव स्वीकारला आहे. काँग्रेस नामशेष होत चालली आहे. मागील निकडणुकीत राहिलेले दोन आमदार यावेळी पराभूत होतील. यावेळी मंचावर माजी आमदार दादाराव केचे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रशांत शाहगडकर यांच्यासह अनेक भाजप-शिवसेना युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.