वर्धा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनादेश यात्रा गुरुवारी दुपारी 3 वाजता वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील तळेगाव येथे पोहोचणार आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजपकडून जय्यत तयारी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांची आर्वी पूलगाव येथे सभा होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत भाजपचे वर्ध्याचे आमदार पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी खासदार विजयराव मुळे, सुरेश वाघमारे, तसेच पक्षाचे महामंत्री उपस्थित होते.
आर्वी येथे साडेचार वाजता क्रीडा संकुल येथे सभा होणार आहे. त्यानंतर पूलगाव येथे सर्कस ग्राऊंडवर सहा वाजता सभा होईल. यावेळी वर्ध्यात गुरुवारी सायंकाळी 8 वाजता सर्कस ग्राऊंडवर जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुक्कामी असतील. तसेच दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्टला जनादेश यात्रा पवनार सेलू केळझर सेलडोहला थांबून येथे स्वागत सभा घेत बुट्टीबोरील मार्गक्रमण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या जनादेश यात्रेतून मागील पाच वर्षात सरकारच्या वतीने राबवण्यात आलेल्या योजना तसेच केलेल्या कामाचा आढावा जनतेला सांगण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, आमदार पंकज भोयर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कर्जमाफी, दुष्काळी निधीचे काय झाले - आमदार बच्चू कडू
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी विदर्भात येत असताना शेतकऱ्यांसाठी दुष्काळी निधी, कर्जमाफीची व्याख्या काय आहे. या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी द्यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. सरकार शेतकरी विरोधी आहे, असे म्हणत त्यांनी नारेबाजी करत आंदोलन केले. यावेळी बच्चू कडू यांनी भाजप-शिवसेनेत जात असलेल्या संधी साधू लोकांवर टीका केली.