वर्धा - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार चारुलता राव टोकस यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला. सद्भावना भवन काँग्रेस कमिटी कार्यालयातून शक्तिप्रदर्शन आणि ढोलताशांच्या गजरात नामांकन भरण्यासाठी रॅली काढण्यात आली. यावेळी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा प्रभा राव यांच्या कन्या यांनी उमेदवारी दाखल केली.
यावेळी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार रणजित कांबळे हे उपस्थित होते. तसेच आमदार अमर काळे, वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश देशमुख, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सर्व सामान्यांचा प्रश्नांना घेऊन लढू -
सर्व सामान्य लोकांशी निगडित प्रश्न असतील, रखडलेली विकासाची कामे, बेरोजगारी, सिंचनाचे आणि शेतकऱ्यांच्या कर्जाचे प्रश्न घेऊन लढू, असे चारुलता राव टोकस यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीचे माजी आमदार राजू तिमांडे यांची गैरहजेरी
नामांकन अर्ज भरताना पहिल्याच दिवशी नाराजीचा सूर दिसला. हिंगणघाट मतदार संघात राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेला भाग आहे. असे असताना माजी आमदार राजू तिमांडे यांना डावलण्यात आले. निरोप न मिळाल्याने नामाकंन भरताना आलो नाही, असे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना तिमांडे यांनी सांगितले.
मी सामान्य कार्यकर्ता आहे. एकटा येणार नाही, कार्यकर्ते घेऊन येईन, पण निरोप भेटला नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.