वर्धा - येथील पद्मावती नगरात दिवसाढवळ्या दोन दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी पळवल्याची घटनेने चांगलीच खळबळ उडाली. घटनेनंतर आरडाओरडा होताच नागरिकांनी चोरांचा पाठलाग केला. पण, दुचाकीने आलेल्या चोरट्याने धूम ठोकली. ही घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पण, यामध्ये चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने रामनगर पोलिसांना शोध घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. कान्होपात्रा धनविज असे तक्रारदार महिलेचे नाव आहे.
कान्होपात्रा धनविज या कामात असताना एका दुचाकीवरून दोघे आले. यावेळी त्यांनी काही आडनाव सांगत घराचा पत्ता विचारला. यावेळी पत्ता सांगताना कान्होपात्रा याचे लक्ष विचलित होताच गळ्यातील सोनसाखळी घेत दोघेही दुचाकीवरून पसार झाले. यावेळी आरडाओरडा होताच लोकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण, दुचाकीस्वार चोरटे पसार होण्यास यशस्वी झाले.
चोरटे पसार होताना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले. यावेळी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी रामनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली. यात आरोपीची शोधमोहीम सुरू केली. प्रकरणात घटनस्थळाची पाहणी रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी चौकशी सुरू केली असल्याची माहिती दिली.
हेही वाचा - #विज्ञान दिन : प्रयोगातून ज्ञानाकडे..! प्रात्यक्षिकातून विद्यार्थी मिळवतात प्रश्नांची उत्तरे