वर्धा - जिल्ह्यातील आर्वी शहरात रविवारी साईनगर परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत गर्दी केली. यामुळे शासनाच्या वतीने केली जाणारी जनजागृती फोल ठरताना दिसली. तेही आर्वी विधासभेच्या आमदार दादाराव केचे यांच्या घरापुढेच हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी आमदार केचे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आमदार दादाराव केचे यांचा रविवारी वाढदिवस होता. या निमित्ताने काही लोकांना धान्य वाटप करण्यात येणार होते. यामध्ये 21 जणांना धान्य वाटपसुद्धा करण्यात आले. त्यानंतर ते बाहेर दर्शनासाठी मंदिरात निघून गेले. मात्र, धान्य वाटप होत असल्याचे कळताच केचे यांच्या घरापुढे धान्य भेटणार असल्याच्या आशेने गर्दी उसळली. ही गर्दी संचारबंदी आणि सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: उल्लंघन करणारी ठरली. यावर सोशल मीडियावर टीका होत वातावरण तापले. मात्र, आमदार दादाराव केचे यांनी लोकांना घरापर्यंत येऊ नये, असे आवाहन केले असतांना हे विरोधकांचे षड्यंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शहरात याचा फोटो, व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर टीका होऊन कारवाईची मागणी होऊ लागली. याची माहिती आर्वी शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घरापुढे झालेली गर्दी परतून लावली. यामध्ये आमदार दादाराव केचे यांनी सांगितल्याप्रमाणे घरात नसतांना लोकांनी गर्दी केली. शिवाय काहीजण शुभेच्छा देण्यासाठी आले होते. मागील काही दिवसांपासून गरजूंना धान्य वाटपाचे काम चालू आहे. मात्र, रविवारी घरापर्यंत कोणालाही बोलावले नसतांना वाढदिवसानिमित्य धान्यवाटप होत असल्याचे सांगून लोकांनी येथे गर्दी केल्याचे षड्यंत्र असल्याचे ते म्हणाले. तसेच विरोधकांनी जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याचा आरोप आमदार दादाराव केचे यांनी माध्यमांशी बोलतांना केला.
सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करत आमदार केचे यांच्यावर टीका करण्यात आली. सोबतच प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावर उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी कारवाई करण्याचे पत्र पोलीस प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जमावबंदी, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन, साथीरोग नियंत्र आदेशाचे उल्लंघन आदि कलमान्वये केचे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.