वर्धा - देशभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून लघु व मध्यम उद्योग आर्थिक संकटातून जात आहे. यातच कलावंतानाही कोरोनाचा फटका बसल आहे. संगीत कलोपासक संघटनेने शहरातील गांधी पुतळ्याजवळ भजन-कीर्तन करत भीक मांगो आंदोलनातून आपली समस्या मांडली.
कोरोना महामारीमुळे कला क्षेत्रात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यक्रमांवर घातलेल्या बंदीमुळे त्यांचे आर्थिक गणितच थांबले. यावर्षीचा हंगामच वाया गेल्याने कलावंतासमोर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला आहे. या आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी शासनाने कलावंतांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.
कलावंतांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भीक मांगो आंदोलनासह भजन सत्याग्रह करण्यात आला. कलावंतांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, शासनाच्या नियम व अटी पाळून कलावंतांना कार्यक्रम सादर करण्याची परवानगी द्यावी, संगीत शिकवणी वर्गांना परवानगी द्यावी, आदी मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात संगीत कलोपासक संघटनेचे अध्यक्ष श्याम सरोदे, सचिव किरण पटेवार, लोककलावंत शंकर तिखे, धनंजय नाखले, संजय तिळले, शिवाजी चावरे, मोहित सहारे, सुनील ढाले, किशोर काळे, प्रकाश गवारकर, माने, सुरेशपवार, नामदेव काळे महाराज आदी सहभागी झाले होते.