वर्धा - एकीकडे कोरोनामुळे शस्त्रक्रिया करणे कठीण होऊन बसले आहे. पण दुसरीकडे सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान ४८ वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून चक्क आठ किलो वजनाचा ट्युमर काढण्यात आला. ही जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना जवळपास तीन तास लागले.
मूळच्या अमरावती येथील लीला बाबाराव पावडे यांना मागील अनेक महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होता. यामुळेच त्यांच्या शरीरावर निर्माण झालेल्या लहान लहान गाठींचे विघटनही सुरू झाले होते. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता कोणत्याही रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी भरती करण्याचे टाळले जात होते. पण दिवस लोटत असतांना हा ट्युमर पोटात वाढत असतानाच त्रासातही वाढ झाली होती.
अखेर कुटुंबियांनी महिलेला १९ जून रोजी सावंगी मेघे रुग्णालयात भरती केले. त्यानंतर प्राथमिक चाचण्या पार पाडत शास्त्रक्रियेसाठी प्रकृती योग्य असल्याचे निश्चित झाले. यानंतर २१ जून रोजी सुमारे तीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी डॉक्टरांना एक दोन नाही तर चक्क गर्भाशयातून ८ किलो वजनाचा मोठा मांसल गोळा यशस्वीरीत्या काढण्यात यश आले.
ही क्लिष्ट शस्त्रक्रिया ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दीप्ती श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमरदीप टेंभरे, डॉ. सपना शर्मा, डॉ. अमृता खारोडे तसेच बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. निनावे, डॉ. भक्ती पाटील, डॉ. स्नेहा यांनी पूर्णत्वाला नेली. कोरोना काळातही अवघड शस्त्रक्रियेची जोखीम डॉक्टरांनी स्वीकारली असून रुग्णाची महिलेला त्रासापासून मुक्तता झाली असून प्रकृती चांगली व पूर्णतः धोक्याबाहेर असल्याचे डॉ. दीप्ती श्रीवास्तव यांनी सांगितले.