वर्धा - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त वर्धा शहरात शनिवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासूनच उत्सवाला सुरूवात झाली. यावेळी वर्ध्यातील आंबेडकर चौक रोषणाईने उजळून निघाला. भीम अनुयायांनी केक कापून जय भीमचा नारा देत आणि आतषबाजी करत जयंती साजरी केली.
रविवारी सकाळपासून बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार अर्पण करत अभिवादनासाठी जनसमुदायाने गर्दी केली आणि आंबेडकर चौकातील प्रतिमेला हार अर्पण करत अभिवादन केले. या निमित्ताने शहरातील बुद्ध विहार सजले यासोबतच ठिकठिकाणी रॅलीचे आयोजन करत भीम गीते गात भीम अनुयायांनी अभिवादन केले.
आंबेडकर नगर तसेच बौद्ध विहार रोषणाईने आणि निळ्या झेंड्यांनी सजवल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. शहरात बाईक रॅलीदेखील काढण्यात आली. संध्याकाळी मिरवणुका काढत लोकांनी यात सहभाग घेतला. याशिवाय नाटक आणि संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले.