वर्धा - नागपूर-अमरावती महामार्गावर मुंबई वरून भंडाऱ्याला जातांना पोलीस वाहनाचा टायर फुटल्याने अपघात झाला. हा अपघात दुपारी 2 च्या सुमारास घडला आहे. टायर फुटताच चालकांचे वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. या अपघातात अण्णाभाऊ साठे घोटाळा प्रकरणातील सह आरोपी श्रावण कृष्ण बावणे (वय - 65) याचा मृत्यू झाला. इतर तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
भंडारा येथील कारागृहातील आरोपी श्रावण कृष्णा बावणे(वय - 65) याला मुंबई येथील न्यायालयात पेशीसाठी नेले होते. रविवारी कोर्टात हजर केल्यानंतर परतीच्या प्रवासात भंडाऱ्याला जात होते. दरम्यान नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील राजनी शिवारात वाहन गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे पोलीस वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी वाहनाने दुभाजक ओलांडून जवळपास तीन चार पलट्या घेतल्याने वाहन क्षतीग्रस्त झाले. या अपघातात आरोपी श्रावण कृष्णा बावणे यांचा जागीच मृत्यू झाला. तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले. अपघातात अभिषेक घोडमारे, सावन जाधव, शकील शेख, चालक राजेश्वर सपाटे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.
मृत कैदी अण्णाभाऊ साठे घोटाळ्यातील सहआरोपी -
अपघातात मृत्यू झालेला आरोपी हा अण्णाभाऊ साठे महामंडळातील 385 कोटींच्या घोटाळ्यातील सहआरोपी आहे. कैद्याच्या मृत्यू झाल्याने कारंजा न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती अलोने, नायब तहसीलदार शंभरकर, कारंज्याचे ठाणेदार दारासिंग राजपूत, उपनिरीक्षक कविता फुसे, पोलीस कर्मचारी यशवंत गोहत्रे, पवन लव्हाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.