वर्धा - शहरातील हिंदनगर परिसरात लग्नासाठी आणलेल्या ट्रॅव्हल्स बसच्या चाकाखाली आल्याने एका वऱ्हाडी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लग्न उरकून घरी परत जाताना हा अपघात झाला. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घडली.
एका महिलेला सदर व्यक्ती चाकाखाली आल्याचे दिसल्यानंतर ही बाब उघडकीस आली. मृत व्यक्ती नागपूर येथून आला होता. चंदू डडमल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ट्रॅव्हल्स चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
हेही वाचा... पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; १ ठार तर २ जण जखमी
वर्ध्यातील शेंदरे कुटुंबातील वधूचा नागपूर येथील सहारे कुटुंबातील वरासोबत लग्न सोहळा घांगळे लॉन येथे होता. यासाठी दोन ट्रॅव्हल्समधून वऱ्हाडी मंडळी नागपूर येथून आले होते. लग्नसोहळा पार पडला होता. त्यानंतर गावाला जाण्याची तयारी सुरू असताना हा अपघात घडला. परिसरात मोकळ्या जागेवर असलेल्या ट्रॅव्हल्स मुख्य मार्गावर आणत असताना एका ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली ही व्यक्ती आल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. चालकाच्या ही बाब लक्षात येताच दोन्ही ट्रॅव्हल्सचे चालक घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू आहे. यात सदर घटनास्थळावरून पसार झालेल्या ट्रॅव्हल्स चालकांचा शोध रामनगर पोलीस घेत आहेत.