वर्धा - जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. २९४ सरपंच तर १५११ ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील १०३३ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, लोकसभेच्या तोंडावर होत असलेल्या निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
आज संध्याकाळपर्यत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. तर उद्या सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होईल. उद्या सोमवारी दुपारपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जरी पक्षाचा चिन्हावर मतदान नसले तरी सरपंच थेट मतदान पद्धतीने निवडले जाणार असल्याने, राजकीय पक्षाच्या वतीने दावे मात्र केले जात आहेत. त्यामुळे किती सरपंच कुठल्या राजकीय पक्षासोबत जोडले जाणार हे निकाल स्पष्ट झाल्यानंतरच कळेल. मात्र, या निवडणुकीकडे जिल्ह्याचे राजकारण ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.