वर्धा - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदासाठी आज (२९ फेब्रुवारी) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी नागपूर महसूल विभागातून सात उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये वर्ध्यातील दोन उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी आठ वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदानाला सुरुवात होणार आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदासाठी विदर्भातूनही संचालक निवडले जातात. यामध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामध्ये वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. सहा जिल्ह्यांत ४५ कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. यामधील ६४५ संचालक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
वर्धा जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितींचे १०५ संचालक यासाठी मतदान करणार आहेत. नागपूर विभागातून सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीकडून हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी तसेच हुकूमचंद आमदरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप युतीकडून वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर तसेच आवेश खान पठाण हे दोन जण रिंगणात आहेत. याशिवाय अन्य तीन उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.