वर्धा - दयाल नगर परिसरातील मंदिराजवळ उभ्या असलेल्या मालवाहू रिक्षाला टिप्परने जबर धडक दिली. धडकेनंतर ही रिक्षा मंदिराबाहेर बसलेल्या लोकांच्या अंगावर गेली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. किसन मारोतराव कांबळे (वय ७३) असे मृताचे नाव आहे. यातील दुसऱ्या मृताची ओळख पटू शकलेली नाही. जखमीवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
वर्धा यवतमाळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. याच मार्गावरील देवळी नाका भागात मंदिर आहे. याच मंदिराजवळ झाडाच्या सावलीत मालवाहू रिक्षा उभी करण्यात आली होता. एवढ्यात मागून येणाऱ्या टिप्परने उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की मालवाहू रिक्षा मंदिरा शेजारी असणाऱ्या तिघांच्या अंगावर चढली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसरा गंभीर जखमी झाला. काका शेंबडे (वय ७५) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर सावंगी मेघे येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
यातील एका मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. टिप्पर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने उभ्या मालवाहू रिक्षाला धडक दिली, असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. यात मालवाहू रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी मालवाहू चालक नसल्याने त्याचे प्राण वाचले. मात्र मंदिराबाहेर बसून दोन वेळची भूक भगवणारा वयोवृद्ध मात्र ठार झाला. पोलिसांनी गुन्हा नोंद करत टिप्पर ताब्यात घेतला आहे.