रायगड - जिल्ह्यात आज पावसाचा जोर ओसरू लागला आहे. महाडमधील पूरस्थिती ओसरली असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. महामार्गावरील पाणी ओसरले असल्याने वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. जिल्ह्यात पाऊस कमी झाला असला, तरी तुरळक सरी पडत आहे.
महाड मधील सावित्री, गांधारी नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडली होती. आज त्या धोका पातळीच्या खाली वाहत आहेत. या पावसात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मात्र, हवामान विभागाने अतिवृष्टी होण्याचे संकेत दिल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, गांधारी या नद्यांनी आपली धोका पातळी ओलांडली होती. त्यामुळे महाड, नागोठणे, रोहा, पाली, माणगाव, गोरेगाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. पावसाचा जोर असल्याने अनेक रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला होता. पावसात आतापर्यत तीन जण वाहून गेले आहेत. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. महाड मध्येही पुराचे पाणी ओसरले असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पुरामुळे झालेली अस्वच्छता काढण्याचे काम नगरपालिकाने सुरू केले आहे.