पणजी - नाफ्ता भरलेले जहाज दोनापावल येथील समुद्रात रुतले आहे. ते बाहेर काढण्यासाठी गोवा सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यासाठी लागणारा वेळ विचारात घेऊन या परिसरात तटरक्षक दल, नौदल आणि गोवा पोलीस यांच्या देखरेखीखाली जहाज ठेवण्यात आले आहे.
मुरगाव बंदरात आलेले 'नू-शी-नलीनी' हे जहाज मानवरहित असून यामध्ये सुमारे 26 हजार मेट्रिक टन नाफ्ता हा ज्वालाग्राही पदार्थ असल्याचे मुरगाव पोर्ट ट्रस्ट (एमपीटी)चे म्हणणे आहे. कस्टम विभागाने दाखविलेल्या सतर्कता आणि आठवड्यापूर्वी झालेले वादळ यामुळे हे जहाज बेवारस स्थितीत किनाऱ्याच्या दिशेने येताना दोनापावल येथे खडकात रूतून बसले आहे. यावर गोवा सरकार लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी राज्याचे मुख्य सचिव, मुरगाव पोर्ट ट्रस्ट, नौदल, तटरक्षक दल आणि जहाज उद्योग मंत्रालय यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत, तर गोव्याच्या महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी मंगळवारी समुद्रात जाऊन संबंधित जहाज परिसराची पाहणी केली होती.
जहाज बाहेर काढण्यासाठी प्रथम त्यावरील नाफ्ता हलविणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईहून हायड्रोलिक पंप मागविण्यात आला होता. आज सकाळी नौदलाने एअरक्राफ्टच्या सहाय्याने ऑपरेशन सुरू केले. मात्र, तो जहाजावर सोडत असताना समुद्रात पडला. त्यामुळे नाफ्ता हटविण्याचे काम 2 नोव्हेंबरपासून सुरू होईल.
संबंधित बोटीवर हायड्रोलिक पंप ठेवत असताना समुद्रात पडला. त्यामुळे मुंबईहून दुसरा पंप मागविण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला उशीर होत असून तो पंप प्राप्त होताच कामाला सुरुवात केली जाईल. कामाला सुरुवात केल्यानंतर पाच दिवसांत ते पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. तसेच विरोधी पक्षांनी गोवा सरकारमधील मंत्र्यांवर केलेल्या आरोपात तत्थ नसल्याचे सांगत फेटाळून दिले.
नौदल एअरक्राफ्टच्या सहाय्याने हायड्रोलिक पंप संबंधित जहाजावर सोडण्यात येणार होता. मात्र, जहाजावर असलेल्या ज्वालाग्राही नाफ्तामुळे प्रत्यक्ष कारवाई दरम्यान दुर्घटना घडण्याची शक्यता विचारात घेत एअरक्राफ्ट सुरक्षेसाठी पंप पाण्यात सोडला गेला.
दरम्यान, या परिसरात 500 मिटर समुद्रात मच्छीमार बोटींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे येथील बोटी गेल्या ४ दिवासांपासून किनाऱ्यावर उभ्या असल्याची माहिती माहिती प्राप्त झाली आहे.