मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध लादण्यात आले आहेत. रस्त्यांवर विनाकारण वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कलर कोडचे नियम लावले होते. मात्र, काही दिवसातच हे कलर कोडचे नियम रद्द करण्यात आले आहेत. आता फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना रस्त्यावरून वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कलर कोडचे नियम रद्द केल्यानंतरही वाहनांची तपासणी सुरूच राहील, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
इतर अत्यावश्यक सेवेत असलेल्या वाहनांवर पिवळा कलर कोड लावण्यात आला होता. अत्यावश्यक मेडिकल सेवा देणाऱ्या वाहनांवर लाल, भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कोड होता. ज्या वाहनांवर कलर कोड असेल त्याच वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिली जात होती.
ई-पासची सुविधा -
महाराष्ट्र पोलीस खात्याकडून अत्यावश्यक कारणासाठी आंतरजिल्हा किंवा परराज्यात प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पासची सुविधा देण्यात आली आहे. covid19.mhpooice.in या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांना ई-पास घेता येईल. एखाद्या व्यक्तीकडे इंटरनेटची व्यवस्था नसेल तर, तो राहत असलेल्या परिसरातील स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये जाऊन हा पास मिळू शकतो. मागीलवर्षी देखील लॉकडाऊनमध्ये ई-पासची सुविधा देण्यात आली होती.