पॉर्न फिल्मचे शुटिंग करीत असल्याच्या गुन्ह्याखाली राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली आहे. तो पॉर्न व्हिडिओ बनवून अॅपवर अपलोड करीत असे, असा त्याच्यावर आरोप आहे. मंगळवारी त्याला न्यायालयाने 23 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी ओडिशाच्या भरतपूर पोलीस ठाण्याच्या परिसरातून एका तरुणाला अटक केली आहे. देबाशिष कीर्तनिया असे या 27 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मुंबई पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.
आतापर्यंत राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक
मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणाले, की राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. त्याच्याविरोधात आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये मुंबईत अश्लील सिनेमा व चित्रफित बनवले जात असून ते मोबाईल ॲपद्वारे प्रदर्शित केली जात होते. याप्रकरणी गुन्हे शाखा तपास करत होती. त्याच बरोबर याप्रकरणी राज कुंद्राचीही चौकशी करण्यात आली होती. आज सगळ्या प्रकरणाचे कुंद्रा मुख्य सूत्रधार आहेत, असे पुराव्यांनिशी दिसून येत आहे. त्यामुळे त्याला अटक केल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले. यापूर्वीही राज कुंद्राची पोलिसांनी विविध प्रकरणात चौकशी केली होती.