रायगड - बहुचर्चित अशी भाऊचा धक्का ते मांडवा रोरो बोटसेवा अखेर आज मांडवा बंदरात प्रवाशांना घेऊन दाखल झाली आहे. भाऊचा धक्का येथुन 26 कार, 9 दुचाकी आणि पहिल्या 206 प्रवाशांना घेऊन मांडवा बंदराला लागली आहे. ऐन गणेशोत्सव काळात रोरो बोटसेवा सुरू झाल्याने मुंबईतून येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे.
भाऊचा धक्का ते मांडवा रोरो बोटसेवा कधी सुरू होणार हा अलिबागकरासह रायगडकरांना प्रश्न पडला होता. फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोरो बोटसेवेला हिरवा कंदील दाखविला होता. मात्र त्यानंतर राज्यात सुरू झालेल्या कोरोना संकटामुळे सर्वच ठप्प झाले होते. भाऊचा धक्का ते मांडवा रोरो बोटसेवाही सुरू होण्याआधीच बंद झाली होती. त्यामुळे ही बोटसेवा कधी सुरू होणार हा एक प्रश्न निर्माण झाला होता.
गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने कंपनी आणि शासनाने रोरो बोटसेवा कधी सुरू होणार हा प्रश्न सोडविला आहे. आज 20 ऑगस्टपासून ही रोरो बोटसेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. आज सकाळी सव्वा नऊ वाजता भाऊचा धक्का येथून प्रवासी आणि वाहनांना घेऊन रोरो बोट निघाली. सव्वा दहा वाजता प्रवाशांना घेऊन बोट मांडवा बंदरात दाखल झाली. ही रोरो बोट सेवा 30 ऑगस्ट पर्यंत अकरा दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात सुरू झालेली ही रोरो बोटसेवा प्रवाशांना दिलासा देणारी ठरली आहे.