मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत अजूनही साशंकता आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग परीक्षा घेण्याबाबत आग्रही असला, तरी राज्य सरकार परीक्षा होणार नाही ,असे सांगत आहे. यामुळे तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा लवकर सुटावा आणि परीक्षा रद्द होऊन विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी व्हावा, अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनने केली आहे. सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाला जागे करण्यासाठी प्रहारकडून 'ईमेल भेजो आंदोलन' करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणामध्ये लक्ष द्यावे. राज्याचा आणि केंद्र सरकारचा समन्वय साधावा. अंतिम परीक्षा रद्द करावी आणि अगोदरच्या पाच परीक्षांची सरासरी घेऊन विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि पदवी प्रदान करावी, अशी आमची मागणी असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अॅड. मनोज टेकाडे यांनी सांगितले.
संपूर्ण विषयासंदर्भात प्रहार संघटनातर्फे नरेंद्र मोदी यांना ईमेल पाठवणार आहोत. अंतिम परीक्षा रद्द व्हावी म्हणून ई-मेल आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन टेकाडे यांनी केले. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे, सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शक्य नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तर सप्टेंबरमध्ये परीक्षा घ्या, असे अनुदान आयोग सांगत आहेत. यूजीसी-राज्य सरकार परीक्षा वादामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत.